काश्मीरमधून २३२ प्रवासी विमानाने मुंबईत दाखल   

मुंबई, (प्रतिनिधी) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेले तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८०० पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
 
दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी १८४ प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून ४१६ महाराष्ट्रातील पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे ८०० प्रवासी परत आले आहेत. 

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणार

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
 

Related Articles